लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी विविध पक्षांमध्ये आघाडी करण्यासाठी रस्सीखेच सुरू असली तरी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे ठरविले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका महामेळाव्यात मायावती यांनी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस, भाजप अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी बसपा युती करणार नाही, देशभरात बसपा स्वबळावर निवडणुका लढवेल, असे मायावती यांनी सावधान विशाल महारॅलीत जाहीर केले. उत्तर प्रदेश अथवा देशपातळीवर बसपा कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
सहा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात एक मुख्यमंत्री गोध्रात हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील दंगल रोखू शकत नाही ती व्यक्ती विविध जातीधर्माच्या जनतेमध्ये एकोपा कसा साधणार, असा सवालही मायावती यांनी केला. सभेच्या निमित्ताने बसपाने मोठे शक्तीप्रदर्शन केले.
दलितांचा ‘आम आदमी’ म्हणून विचार करणे आम आदमी पार्टीला काही काळ राजकीय लाभ मिळवून देईल. हे पक्ष दलितांना आम आदमी संबोधतात, मात्र दलित हे आम आदमी असते तर त्यांना स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची गरजच भासली नसती.