उत्तर प्रदेश विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी सत्तारूढ सपामधील इच्छुकांनी जोरदार जुळवाजुळव सुरू केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याच वेळी बसपाच्या आठ सदस्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यांचे सभागृहातील बहुमत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे आठही जागा नामनियुक्त वर्गवारीतील आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत असलेल्या सपाच्या संख्याबळामुळे पक्षाला परिषद निवडणूक सुलभ जाणार आहे.
उमेदवारांची अंतिम यादी  मुलायमसिंह जाहीर करणार असून त्यासाठी सपाचे राज्य सचिव एसआरएस यादव, जितेंद्र यादव, युवा नेते आनंद भादुरिया, नफीस अहमद आणि सुनील यादव, गीता सिंह, जावेद आबिदी आणि उज्ज्वल रमण सिंह यांच्या नावांची चर्चा आहे. विधान परिषदेत सपाचे २६ सदस्य आहेत, मात्र बहुमत मिळण्यासाठी पक्षाला  २०१६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.