हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकांअगोदर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) यांच्यात युती होण्याची चिन्ह दिसत असतानाच, आज येथील आगामी विधानसभा निवडणुकीत बसपाने स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस व बसपाच्या युतीच्या शक्यतांना पूर्णविराम लागला आहे.

बसपाचे राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी या दोन्ही पक्षांची युती होणार नसल्याची माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी हे देखील सांगितले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा हरियाणातील सर्वच ९० जागांवर उमेदवार देणार आहे. याचबरोबर आम्ही काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हरियाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी शैलजा आणि हरियाणा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी आज बसपा प्रमुख मायावती यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

हरियाणात याच वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुक आयोग लवकरच हरियाणासह झारखंड व महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत हरियाणातील ९० पैकी ४७ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ १५ व इंडियन नॅशनल लोकदलास १९ जागा मिळाल्या होत्या.