बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यात रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी राज्यसभेत झालेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद अजूनही उठताना दिसत आहेत. हातात स्मृती इराणींचे शिर आणि पायाखाली नरेंद्र मोदी असे देवी कालीमातेच्या रुपातील मायावतींचे चित्र बसपच्या एका कार्यकर्त्याने स्वत:च्या फेसबुक पेजवर पोस्ट केले. या चित्रावरून जनमानसात संताप निर्माण होताच सदर कार्यकत्याने हे चित्र फेसबुक पेजवरून काढून टाकले. बालमुकुंद धुरिया नावाचा हा कार्यकर्ता बसपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष रामअचल राजभर यांच्या जवळचा असल्याचे समजते. ‘भाजपवाल्यांनो सावध व्हा, तुमचा खोटेपणा चालणार नाही, बेइमानीचा व्यापार, बहनजी आहेत तयार, यावेळी बसपा सरकार’ असा संदेशदेखील त्याने चित्रासह पोस्ट केला होता. वादातीत फेसबुक पोस्ट प्रकरणानंतर रामअचल राजभर यांनी आपला बालमुकुंदशी संबंध नसल्याचा खुलासा केला. बसपनेदेखील याप्रकरणापासून अलिप्तता बाळगली आहे. आपल्या वादातीत फेसबुक पोस्टमुळे वातावरण संतप्त होत असल्याचे लक्षात येताच बालमुकुंद धुरियाने ही पोस्ट आपल्या फेसबुक खात्यावरून काढून टाकली आणि कोणाच्याही भावना दुखविण्याचा आपला उद्देश नव्हता असा संदेशदेखील पोस्ट केला.
ज्यांना वैचारिक पातळीवर विरोध करता येत नाही ती माणसे अशाप्रकारची कामे करतात, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे उत्तर प्रदेशातील अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी म्हणाले, मायावती यांना कालीमातेच्या स्वरुपात दाखविणाऱ्यांना मी विनंती करतो की, त्यांनी मायावतींना कालीमातेच्या रुपात दर्शविले आहे, आता त्यांनी कालीमातेची पूजा करण्यासदेखील प्रारंभ करावा.