21 January 2021

News Flash

‘एमआयएम’ने वळवला गुजरातकडे मोर्चा; आगामी निवडणुकांसाठी ‘या’ पक्षाशी केली हातमिळवणी

खासदार इम्तियाज जलील यांनी दिली माहिती

संग्रहीत

बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम)ने आता गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे. एमआयएम आता गुजरातमधील आगामी काळातील स्थानिक निवडणुकांसह विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) बरोबर एमआयएमने हातमिळवणी केली आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

“मागील अनेक वर्षांपासून गुजरातच्या जनतेची अशी इच्छा आहे की, एमआयएमने गुजरातमध्ये देखील यावं. यासाठी अनेक दिवसांपासून तिथले लोकं आमच्या संपर्कात होते. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील गुजरातमधील अनेकांनी या पार्श्वभूमीवर भेट घेतली आहे. त्यामुळे आम्ही आता छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) बरोबर राहून गुजरातमधील आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात छोटूभाई वासवा व एमआयएम अध्यक्ष ओवसी यांची बैठक देखील झाली आहे. यानंतर मला ओवसींकडून गुजरातला जाऊन बीटीपीच्या नेते मंडळींशी पुढील रणनीती संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये मी गुजरातला जाणार आहे.” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

साधरण आठवडाभरापूर्वीच एमआयएमकडून राजस्थानमध्ये बीटीपीला समर्थन देण्याची घोषणा करण्यात आली होती. यावरून असं दिसत आहे की, एमआयएम आगामी काळातील पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्येही नशीब अजमावू शकते.

बीपीटीचे आमदार छोटूभाई वासवा यांनी सांगितले की, एमआयएमने गुजरातमधील आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) बरोबर युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्यघटना वाचवण्यासाठी बीटीपी व एमआयएम एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वासवा यांनी ट्विट देखील केले आहे.

गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये जिल्हा पंचायत आणि तहसील पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. छोटू वासवा यांचे म्हणणे आहे की, लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि भाजपा दोघांना हटवण्यासाठी काम करावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:28 pm

Web Title: btp and aimim will contest together the next assembly election in gujarat imtiyaz jaleel msr 87
Next Stories
1 ‘या’ राज्यात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई
2 नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा; पंतप्रधान मोदी यांचं देशवासीयांना आवाहन
3 … तर बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार; रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांची माहिती
Just Now!
X