राजस्थानातील राजकीय नाट्यावर अजूनही थांबलेलं नाही. ऑडिओ क्लिप प्रकरण समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आरोप करणाऱ्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही एसओजीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच बीटीपीचे आमदार गेहलोत यांच्याविरोधात जाऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.

राजस्थानातील घडामोडींविषयी इंडिया टुडेला बोलताना राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष व नागौरचे आमदार हनुमान बेनीवाल म्हणाले, “मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचा गैरवापर केला जात आहे. ते फोन टॅप करीत आहेत. अलीकडे पती पत्नीशी बोलताना घाबरत आहे. आमच्या आयुष्यात कसलीही गोपनीयता राहिलेली नाही,” असं बेनीवाल म्हणाले.

“राज्यात काँग्रेस सरकारनं जनतेचा विश्वास गमावला आहे आणि हे सरकार पडेल. गेहलोत यांनी दोन वेळा संशयास्पद मार्गाचा अवलंब करून मायावतीच्या आमदारानं पक्षात आणलं. बीटीपीचे (भारतीय ट्रायबल पार्टी) जे आमदार आपल्याला बंदिस्त केल्याचं सांगत होते, ते आज अशोक गेहलोत यांच्याबरोबर आहे. पण, जेव्हा सभागृहात बहुमताची चाचणी होईल, तेव्हा हे आमदार गेहलोत यांच्या विरोधात जाऊ शकतात,” असं बेनीवाल म्हणाले.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर केलेल्या आरोपा विषयी बोलताना बेनीवाल म्हणाले,”मी हे ३ हजार वेळा सांगतो. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांच्याविरोधात सातत्यानं बोलत आहे. त्यामुळेच मी माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला,” असं बेनीवाल यांनी सांगितलं.

बेनीवाल यांनी काही दिवसांपूर्वी वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचं सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. याचे ठोस पुरावेही आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.