बकिंघम पॅलेसच्या एका शाही सहाय्यकाला करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) त्यांच्या लंडन इथल्या निवासस्थानीच होत्या. त्यामुळे आता सुरक्षेखातर त्यांना महालातून विंडसर पॅलेस याठिकाणी अनिश्चित काळासाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सहाय्यकाच्या संपर्कात आलेले सर्व कर्मचारी स्वविलगीकरणात राहत आहेत.

‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बकिंघम पॅलेसमध्ये जवळपास ५०० जण काम करतात. एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांइतकीच ही संख्या आहे. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचं पॅलेसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.’

आणखी वाचा : कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांच्या वैद्यकीय तपासणीचा आला रिपोर्ट

करोनाची लागण झालेला सहाय्यक राणी एलिझाबेथ यांच्या संपर्कात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, करोना विषाणूमुळे शनिवारी इंग्लंडमध्ये ५३, व्हेल्समध्ये दोन तर स्कॉटलँडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. युकेमध्ये करोनामुळे मृतांची संख्या २३३ वर गेली आहे.