जगामध्ये सध्या जे अस्थिरतेचे वातावरण आहे, त्यावर भगवान बुद्धाने शिकविलेले करुणेचे तत्त्व हेच उत्तर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितले. सध्या महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणाऱया व्यवस्थापनाच्या धड्यांपेक्षा गौतम बुद्धाची शिकवण जास्त मौल्यवान असल्याचेही ते म्हणाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भगवान बुद्धाची शिकवण आजच्या काळातही किती उपयुक्त आहे, यावर भाष्य केले.
मोदी म्हणाले, अस्थिरतेच्या वातावरणातून जगाचा प्रवास सुरू आहे. सर्वत्रच हिंसाचारात वाढ झालीये. वेगवेगळ्या देशांमध्ये रक्तपात होताना दिसतो आहे. लोक एकमेकांचे रक्त शोषण्यास तयार आहेत. या सगळ्या स्थितीत बुद्धाच्या शिकवणुकीतून मार्ग काढता येईल. आपण स्वतःही गौतम बुद्धाच्या शिकवणुकीने प्रभावित झालो असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशवारीवर असताना तेथील गौतम बुद्धाची मंदिरे बघण्यासाठी मी एक दिवस कायम राखीव ठेवतो, असेही मोदी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या आघातातून शेजारी नेपाळ लवकरच बाहेर पडेल आणि नव्या ताकदीसह पुन्हा उभा राहिल, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.