आज संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अरूण जेटलींचे कौतूक केले. मी इतक्या वर्षात संसदेत अनेक अर्थसंकल्प सादर होताना पाहिले आहेत. मात्र, आज अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असे अडवाणींनी सांगितले.
यंदाचा अर्थसंकल्प हा कृषी आणि ग्रामीण विकासाच्या दुर्लक्षित कार्याला नवसंजीवनी देणारा असल्याचे मतही लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पाची प्रशंसा करताना अडवाणी म्हणाले की, हा अर्थसंकल्प कृषी आणि ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून योजण्यात आलेल्या उपाययोजना या चैतन्यदायी असल्याचे अडवाणींनी म्हटले. याशिवाय, भाजपमधील अन्य नेत्यांनीही हा अर्थसंकल्प दूरदृष्टी आणि पुरोगामी असल्याचे म्हटले. यामुळे शेतकरी आणि दुर्बल घटकांना प्राधान्य मिळण्याबरोबरच तरूणाईचे सक्षमीकरण होईल, असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. मात्र, आज इतक्या वर्षांनंतर कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देणार अर्थसंकल्प सादर झाल्याचे केंद्रीय पर्यायवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.