प्राप्तिकरातील करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ केली जाईल, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. पण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्राप्तिकराच्या रचनेमध्य कोणताही थेट बदल केलेला नसून, विविध कलमांखाली काही प्रमाणात सूट देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहेत तरतुदी
– प्राप्तिकर कलम ८७ ए नुसार पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना करामध्ये ३००० रुपयांची वजावट मिळणार आहे
– ८० जीजी नुसार, स्वतःच्या मालकीचे एकही घर नसणाऱ्या करदात्यांना मिळणारी घरभाडे करसवलतीची मर्यादा २४ हजारांवरून ६० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे
– ५० लाखांपर्यंत घर घेणाऱ्या करदात्यांना पुढील आर्थिक वर्षात करपात्र उत्पन्नामध्ये थेट ५० हजारांची वजावट मिळणार आहे. ही सूट एकाच आर्थिक वर्षासाठी घेता येणार आहे. ३५ लाखांपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्यांना या सवलतीचा फायदा घेता येईल
– एक कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी प्राप्तिकरावरील अधिभार १२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला आहे
– परवडणारी घरे बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना करांमध्ये मोठी सवलत देण्यात येणार आहे. देशातील चार महानगरांमध्ये हे प्रकल्प असले पाहिजेत आणि तीन वर्षांत ते पूर्ण केले पाहिजेत, असेही बंधन सरकारने घातले आहे.