आगामी अर्थसंकल्पात ३००० कोटी रुपयांची तरतूद

प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी रेल्वेकडून देशातील सर्व ८५०० स्थानकांवर आणि ११ हजार रेल्वेंमध्ये १२ लाख सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये साधारण ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

सध्या देशातील ३९५ स्थानके आणि ५० रेल्वेवर सीसीटीव्ही बसवलेले आहेत ही सुविधा सर्व स्थानके आणि रेल्वेवर विस्तारित करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत राजधानी, शताब्दी, दुरंतो, लोकल पॅसेंजर तसेच उपनगरीय रेल्वे आदी सर्व रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. त्यात दरवाजे, मार्गिका, प्रवाशांची आसने असलेले कक्ष आदी ठिकाणांचा समावेश असेल.

या कॅमेऱ्यांचा खर्च भागवण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात सुमारे ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. याशिवाय अन्य मार्गही शोधले जात आहेत. तसेच निधीची कमतरता भासल्यास खुल्या बाजारातूनही भांडवल उभे केले जाईल.

गेल्या काही दिवसांत रुळांवरून रेल्वे घसरण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. असे प्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या जात आहेत.

सुरक्षारक्षक नसलेल्या ४९४३ रेल्वे क्रॉसिंगवर रक्षकांची सोय करणे किंवा अन्य मार्ग उपलब्ध करून देणे, जुने रूळ बदलणे, सध्याच्या रुळांना मजबुती प्रदान करणे अशा उपायांचा विचार केला जात आहे. २०२० सालापर्यंत अशी सर्व ठिकाणे सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.