केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. सीतारमन यांनी विविध क्षेत्रांसाठी वेगवेगळया तरतुदी जाहीर करतानाच सोने आणि अन्य मौल्यवान धातुंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे सोने आणि अन्य मौल्यवान धातुंच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे.

सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. सध्या सोन्याच्या आयातीवर १० टक्के सीमा शुल्क आहे. अर्थसंकल्प २०१९ मध्ये सोने आणि अन्य धातुंवरील १० टक्के असलेले सीमाशुल्क वाढवून १२.५ टक्के करण्यात आले आहे.

अलीकडेच व्यापाऱ्यांनी सोन्यावरील सीमा शुल्कात कपात करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने व्यापाऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन सोने आणि अन्य मौल्यवान धातुवरील करात वाढ केली. देशांतर्गत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात मोठया प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते.