केंद्र सरकारने आज संसदेत बजेट सादर केले. तत्पूर्वी संसदेत हे बजेट परंपरेप्रमाणे ब्रीफकेसमधून न आणता एका लाल कपड्यात गुंडाळून आणण्यात आले. याची माध्यमांधून खूपच चर्चा झाली. दरम्यान, एकूणच बजेटवर बोचरी टीका करताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बजेट लाल कापडात गुंडाळून आणले यावरही भाष्य केले. ‘काँग्रेसचे पुढचे सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करु, मी सांगितलेली ही गोष्ट लिहून ठेवा,’ असे चिदंबरम म्हणाले.

अर्थमंत्र्यांनी लाल कपड्यात गुंडाळून बजेट संसदेत का नेले याचा खुलासा करताना मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘ही भारतीय परंपरा आहे. पाश्चिमात्य देशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे हे प्रतिक आहे. हे बजेट नव्हते तर खाते वही होती.’

स्वातंत्र्यानंतर देशाचा पहिलं बजेट तत्कालीन अर्थमंत्री आर. के. शणमुगम शेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केलं होतं. त्यावेळी ते बजेटची कागदपत्रे लेदर ब्रीफकेसमध्ये घेऊन आले होते. त्यानंतर आजपर्यंत या ब्रीफकेसचा आकार जवळपास सारखाच होता. मात्र, त्याचा रंग अनेकदा बदलण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९९१मध्ये परिवर्तनकारी बजेट सादर केलं होतं. त्यावेळी त्यांनी ते काळ्या लेदरच्या ब्रीफकेसमधून संसदेत आणलं होतं. त्यानंतर अर्थमंत्री असलेले प्रणब मुखर्जी हे लाल ब्रीफकेस घेऊन संसदेत आले होते. त्यानंतरचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ब्राऊन आणि लाल रंगाची ब्रीफकेस आणली होती. यावर्षी अंतरिम बजेट सादर करणारे प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लाल रंगाच्या ब्रीफकेससहित संसदेत दाखल झाले होते.