आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर भाजपा नेत्यांकडून स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. तर दुसरीकडे विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज सादर झालेला अर्थसंकल्प हा लोककल्याणकारी अर्थसंकल्प होता असं म्हटलंय. तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मात्र या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली आहे. अर्थसंकल्प होता की सुरज बडजात्याचा हॅपी एन्डिग सिनेमा? असा प्रश्न मुंडे यांनी ट्विट करून विचारला आहे.

काय आहे ट्विट?
अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनाच खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे #Budget2019 होतं की सुरज बडजात्याचा हॅप्पी एंडिंग चित्रपट? याआधीच्या चार अर्थसंकल्पातील खोट्या आश्वासनांच्या पूर्वानुभवामुळे जनता यांच्या कोणत्याच शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाही.

मतांवर डोळा ठेवू अनेक घोषणा मोदी सरकारने केल्या असल्या तरीही त्यासाठी पैसे कुठून आणणार ? आर्थिक तूट कशी भरून काढली जाईल? याचे उत्तर मिळालेले नाही. पराभव समोर दिसत असल्यानं निवडणुकांच्या तोंडावर सरकारची जुमलेबाजी करणारा अर्थसंकल्प भाजपाने मांडला आहे अशीही टीका धनंजय मुंडे यांनी केली.