विरोधकांचा गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला मात्र, पहिल्याच दिवशी इंधनदरवाढीच्या प्रश्नावरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज तहकूब करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यसभेत शून्य प्रहरात महिलांसंबंधित मुद्दे उपस्थित केले गेले. त्यानंतर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, काँग्रेससह अन्य विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनदरवाढीवर चर्चा करण्याची मागणी केली. हे सदस्य सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात उतरले. नायडू हे प्रश्नोत्तराचा तासही महत्त्वाचा असल्याचे सांगत होते. या गोंधळात माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उत्तरे देत होते. गदारोळ वाढतच गेल्यामुळे नायडू यांनी, ‘पहिल्याच दिवशी सदस्यांवर कठोर कारवाई करायची नाही’, असे सांगत सभागृह तहकूब केले. लोकसभेतही विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, महिला दिनानिमित्त महिला सदस्यांना मुद्दे उपस्थित करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी सभागृहाचे कामकाज सुरू राहिले पाहिजे, सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. गोंधळ न थांबल्याने बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले.

खरगे यांची मागणी फेटाळली

राज्यसभेत नवनियुक्त विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी इंधनदरवाढीचा मुद्दय़ावर चर्चेची मागणी केली. मात्र, विनिमय विधेयकावरील चर्चेदरम्यान आर्थिक मुद्दे उपस्थित करता येतील, असे सांगत नायडू यांनी खरगे यांची मागणी फेटाळली. पेट्रोलचे दर १०० रुपये, तर डिझेलचे ८० रुपये लीटर झाले आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत. उत्पादन शुल्क-उपकरातून केंद्र सरकारने २१ लाख कोटी जमा केले आहेत. वाढत्या किंमतींमुळे शेतकरीही भरडले जात आहेत, असा आरोप खरगे यांनी केला. लोकसभेत या प्रश्नावर शिवसेना, इंडियन युनियन मुस्लिम लिगने स्थगन प्रस्ताव दिला.

मंगळवारपासून दोन्ही सदनांच्या कामकाजाचे तास वाढवण्यात आले असून ते सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. करोनामुळे सध्या राज्यसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात तर, लोकसभेचे दुपारच्या सत्रात घेतले जाते. आता दोन्ही सदनांचे कामकाज एकाचवेळी सुरू राहील. प्रत्येक सभागृहातील सदस्यांची बैठक व्यवस्था दोन्ही सदनांमध्ये विभागण्यात आली होती. त्यात बदल करून त्या-त्या सभागृहातील सदस्य त्याच सदनात व तिच्या कक्षांमध्ये बसतील.

ग्रंथालयात जा!

संसदेतील ग्रंथालयाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून १४ लाख पुस्तके, शेकडो नियतकालिकांचा अमूल्य ठेवा संसद सदस्यांना उपलब्ध आहे. पण, ग्रंथालयात फारसे कोणी फिरकत नाही, तिथे जाऊन माहिती घ्या, सभागृहात सखोल चर्चा करताना त्याची मदत होईल, असे आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केले. कोणत्या विषयांचे कोणते महत्त्वाचे ग्रंथ इथे आहेत याची माहिती देण्यासाठी ग्रंथालय समिती मोठे फलक लावणार आहे, त्यातून सदस्याचे लक्ष वेधले जाऊ  शकेल, असे नायडू यांनी सांगितले. काही सदस्य दिल्लीत असतात पण, सभागृहात उपस्थित राहात नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दुसरा टप्पा दोन आठवडय़ांचा?

पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने सोमवारी केली. तृणमूलचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापती नायडू यांना पत्र लिहिले असून निवडणुकीमुळे सदस्य अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, असे नमूद केले आहे. अन्य पक्षांच्या सदस्यांनीही लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेच्या सभापतींकडे अशी मागणी केल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा दोन आठवडय़ांमध्ये गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.