संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, २८ फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाईल, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून देण्यात आली. २६ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाणार असून, त्यानंतर २७ फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले जाईल.
केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्याचबरोबर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आर्थिक वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जेटली कोणकोणत्या तरतूदी करतात, याकडे आर्थिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पातून आणखी दिलासा मिळणार की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून त्यांच्या खिशातील पैसा सरकार काढून घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.