अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर मध्यस्थीसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असतानाच शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी नवीन तोडगा सुचवला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर आणि मशीद लखनौत बांधावी, असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाने दिला आहे.

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला राम मंदिर वादाविषयी प्रतिक्रिया दिली. आम्ही अन्य पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असे त्यांनी सांगितले. भारतात शांतता आणि बंधूत्वाची भावना कायम राहावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्यासह काही महंत ५ डिसेंबरपूर्वी सुप्रीम कोर्टात राम मंदिर वादाप्रकरणी तोडग्याबाबत प्रस्ताव सादर करु, असे त्यांनी सांगितले. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी महंत धरमदास, महंत सुरेशदास यांची भेट घेऊन राम मंदिर वादाप्रकरणी चर्चा केली. शिया वक्फ बोर्डाने यापूर्वी सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना राम मंदिर अयोध्येत व्हावा आणि मशीद मुस्लीम बहुल विभागात बांधावी, असे सांगितले होते.

सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये अयोध्येतील राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण सूचना केली होती. अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा संवेदनशील आणि भावनिक आहे. त्यामुळे त्यावर न्यायालयीन निवाड्याऐवजी न्यायालयाबाहेर सहमतीने तोडगा काढावा, अशी सूचना केली होती. आवश्यकता वाटल्यास त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. अयोध्येत मुस्लीम नेत्यांची त्यांनी नुकतीच भेटही घेतली.