ग्रेटर नोएडामध्ये एक चार मजली आणि  बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत अशा दोन इमारती कोसळल्या. ग्रेटर नोएडाच्या शाहबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशीरा या दोन्ही इमारती कोसळल्या. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत.

 

या दोन्ही इमारती आजूबाजूलाच होत्या व जुनी इमारत बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीवर पडली त्यामुळे दुसरी इमारतही कोसळली अशी प्राथमिक माहिती आहे. चार मजली इमारतीत काही कुटुंब राहत होती, तर बांधकाम सुरू असलेल्या सहा मजली इमारतीमध्ये कामगार झोपले होते.त्यामुळे दोन्ही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ५० जण अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक ओ पी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, जिल्हा प्रशासन व पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात केली आहे. मात्र, सध्या ढिगारा जास्त असल्याने अडकलेल्या जखमी व मृतांची निश्चित संख्या समजू शकलेली नाही.’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.