मध्यप्रदेशमधील इंदौर येथे हॉटेलची ४ मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सुमारे ४० जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

इंदौर मधील सरवटे बस स्टँड जवळ एम एस हॉटेल असून या चार मजली हॉटेल मध्ये एकूण २५ खोल्या होत्या. हॉटेलची इमारत धोकादायक स्थितीत होती. महापालिकेने इमारतीला धोकादायक जाहीर केले होते का याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही इमारत कोसळली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. काही वेळातच अग्निशामक दल आणि आपत्कालीन यंत्रणांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. अजूनही मदतकार्य सुरू असून बळींचा आकडा १० वर पोहोचला आहे. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.