समाजवादी पक्षाचे आमदार  बुक्कल नवाब यांनी  भाजप प्रवेश करत, अयोध्येतल्या श्रीराम मंदिरासाठी १० लाख रूपयांची देणगी देऊ अशी घोषणा केली आहे. तसंच श्रीरामाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट भेट देऊ असंही म्हटलं आहे. श्रीरामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलंच पाहिजे अशी आग्रही भूमिकाही त्यांनी घेतली आहे. बुक्कल नवाब आणि ठाकूर जयवीर सिंह या दोन समाजवादीच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बुक्कल नवाब यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर बुक्कल नवाब यांनी अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजावर कसे अन्याय झाले याचाही पाढा वाचला आहे.

अखिलेश यादव जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिया समाजाच्या मुस्लिम बांधवांवर अन्याय केला. त्यांच्या संबंधीचे खटले जाणीवपूर्वक उकरून काढले, अखिलेश यादव यांच्या याच सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी भाजपमध्ये आलो आहे असंही बुक्कल यांनी स्पष्ट केलं आहे. पत्रकारांशी बोलत असतानाच बुक्कल नवाब यांनी स्वतःहून राम मंदिराचा विषय काढला, राम मंदिर अयोध्येत झालंच पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे आणि या मंदिरासाठी मी १० लाख रूपयांची देणगी देणार आहे, तसंच रामाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट देणार आहे असंही बुक्कल नवाब यांनी जाहीर केलं आहे.

बुक्कल नवाब हे जेव्हा समाजवादी पार्टीमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर एका जमीन व्यवहारात ८ कोटी रूपये बेकायदा पद्धतीनं उकळल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र भाजपमध्ये आल्यावर लगेचच बुक्कल नवाब यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही व्यवहारात एका पैशाचाही गैरव्यवहार केलेला नाही. माझ्याविरोधात राजकीय आकसातून आरोप करण्यात आले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

बुक्कल नवाब हे लखनऊ शहरातल्या शिया पंथी मुस्लिम बांधवांचं प्रतिनिधीत्त्व करतात. त्यांचा राजकीय दबदबाही मोठा आहे त्यामुळे भाजपनं त्यांना लगेच पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपमध्ये दाखल होताच बुक्कल नवाब यांनी राम मंदिराला देणगी देण्याची घोषणा करत अखिलेश यादव यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. बुक्कल नवाब यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या व्होट बँकेचा आता भाजपला फायदा कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुक्कल नवाब यांच्यासोबतच ठाकूर जयवीर सिंह यांनीही अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाला कंटाळून समजावादीला जय श्रीराम म्हटलं आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.