बुलंदशहरमध्ये गोहत्येवरून झालेला हिंसाचार हा मोठ्या कटाचा भाग होता आणि मुस्लीमांशी दंगा घडवण्याचा तो एक प्रयत्न होता असे तपासात समोर आले आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक एस.बी. शिरोडकर यांनी केलेल्या चौकशी अहवालात अत्यंत महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचे वृत्त न्यूज १८नं दिलं आहे. हा अहवाल उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आला असून तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात येणार आहे.

हा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग होता हे सिद्ध करणारा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे गायीचा सांगाडा हा ४८ तास जुना होता असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा सांगाडा सगळ्या हिंसाचाराचं मूळ होता, ज्यात एका पोलिस अधिकाऱ्यानं व एका तरूणानं प्राण गमावले. बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख योगेश राज यांनी गोहत्या सयाना गावात झाल्याचे सांगितले असले तरी तशी शक्यता कमी असल्याचे नमूद करताना हा सांगाडा तब्बल ४८ तास जुना होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. योगेश राज यांनी आपण गोहत्या होताना बघितल्याची जबानी दिली आहे. जमावाचं वागणंही हे सूचित करत होतं की काहीजण परिस्थिती चिघळावी व हिंसाचार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

“योगेश राजच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवल्यानंतरही जमावानं रास्ता रोको मागे घेतला नाही. गुन्हा नोंदवल्याचे पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांनी सांगितल्यानंतर काही जण ट्रॅक्टर घेऊन लांब गेले, परंतु गायीचे अवशेष असलेली ट्रॉली रस्त्याच्या मधोमध ठेवून जमावानं रस्ता अडवून ठेवला,” अहवालात नमूद करण्यात आलं आहे. “सुबोध कुमार व तहसीलदार या दोघांच्याही लक्षात आलं की, अवघ्या ३० किलोमीटरवरून येत असलेल्या मुस्लीमांच्या मिरवणुकीशी भिडावं या उद्देशानंच प्रकरण चिघळवण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांनी ती ट्रॉली हटवण्याचा प्रयत्न केला आणि जमावानं विरोध करत हिंसाचार केला, ज्यामध्ये दोघांचे प्राण गेले,” अहवाल सांगतो.

अतिरिक्त पोलिस महासंचालक शिरोडकरांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून पोलिसांना या कटाची पूर्वकल्पना कशी आली नाही असा सवाल विचारला आहे. पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला या कटाची कल्पना असायला हवी होती असे ताशेरे मारण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी पुरेसा फौजफाटा वेळीच पाठवला नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पोलिसांनी गोहत्येच्या आरोपावरून चार मुस्लीमांना अटक केले आहे. गोहत्या कुणी केली हे शोधण्याला उत्तर प्रदेशचे पोलिस जास्त महत्त्व देतात की पोलिस अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्यांना शोधण्यास जास्त महत्त्व देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.