बुलंदशहर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी 18 फरार आरोपींचं छायाचित्र जारी केलं आहे. तसंच या आरोपींची जंगम मालमत्ताही जप्त केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी गुरूवारी स्थानिक न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं, यामध्ये आरोपी योगेश राज आणि भाजपा युवा मोर्चाच्या नगराध्यक्षासह 76 आरोपींचा समावेश आहे.


हिंसाचारात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी चिंगरावठी गावातील असून मोहित आणि नितिन अशी त्यांची नावं असल्याचं समजतंय. कोतवाली पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींची तुरूंगात रवानगी केली आहे.

बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह सुमित नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारप्रकरणी २२ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असलेल्या जितेंद्र मलिक ऊर्फ जितू फौजी याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे.