बंदुकीच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेल्या लष्करी जवानाचा मृतदेह काश्मीरमधील शोपियनमध्ये सापडला आहे. इरफान अहमद दार असे या जवानाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी इरफानची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. इरफान उत्तर काश्मीरमधील गुरेझ व्हॅलीमध्ये कर्तव्य बजावत होता. सुट्टीवर असलेला इरफान कालपासून बेपत्ता होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह शोपियनमध्ये सापडला. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

जवानाची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला शोपियनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला. ‘मृत जवानाची ओळख पटली असून अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. बंदुकीच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेला त्याचा मृतदेह आज सकाळी ताब्यात घेण्यात आला,’ अशी माहिती त्यांनी दिली. अहमद दार हा शोपियन जिल्ह्यातील सेनसेन गावचा रहिवासी होता. अहमद त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी १० दिवसांच्या सुट्टीवर होता.

अहमद दारचा मृतदेह केगाम भागातील वोथमुलामध्ये आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. ‘सकाळी १० वाजता या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. त्याचा मृतदेह घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर आढळून आला. तो सुट्टीवर होता. ज्या ठिकाणी इरफानची हत्या करण्यात आली, त्याच भागात त्याची कारदेखील आढळून आली,’ अशी माहिती शोपियनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली.

जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. ‘इरफान अहमद या शूर जवानाची शोपियनमध्ये हत्या करण्यात आली. आम्ही या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करतो. मात्र अशा घटना काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अडथळे आणू शकत नाहीत. काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यात अशा घटनांमुळे बाधा येणार नाही,’ असे ट्विट त्यांनी केले. याआधी वर्षाच्या सुरुवातीला २२ वर्षीय लेफ्टनंट उमर फयाझची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी उमरचे त्याच्या घरातून अपहरण केले होते. उमर एका विवाह सोहळ्यासाठी सुट्टीवर असताना त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होता. या हत्येचा काश्मिरी जनतेने तीव्र निषेध केला होता.