News Flash

बुलेट ट्रेन: शिवसेनेच्या भूमिकेमुळे होणार मोदी सरकारची गोची, अ‍ॅबेंना काय उत्तर देणार?

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची लवकरच भेट होणार आहे

अ‍ॅबेंना काय उत्तर देणार?

सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकराच्याही अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या बुलेट ट्रेन प्रकल्पाला कर्जपुरवठा करणाऱ्या जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची लवकरच भेट होणार आहे. त्याआधीच या प्रकल्पाचा आढवा घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने मोदी अ‍ॅबेंना काय उत्तर देणार याबद्दल केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे वृत्त आहे.

मोदी आणि अ‍ॅबे महिन्याभरामध्ये भारत- जपान वर्षिक परिषदेअंतर्गत बैठक होणार आहे. ईशान्य भारतामध्ये ही भेट होण्याची शक्यता असली तरी भेटीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या बैठकीत दोन्ही पंतप्रधानांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. या दोघांनीच संयुक्तरित्या २०१७ साली सप्टेंबर महिन्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता. जपानमधील शिंकान्सेन बुलेट ट्रेन तंत्रज्ञानानुसार मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १८ टक्के रक्कम जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) अत्याल्पदरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार होती. मागील वर्षी १८ सप्टेंबर रोजी जेआयसीए आणि भारतीय अर्थमंत्रालयादरम्यान यासंदर्भात एक करारही झाला होता. जेआयसीएकडून भारताला या प्रकल्पासाठी पाच हजार ५९१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली.

बुलेट ट्रेनचे बांधककाम संथ गतीने सुरु असण्यासंदर्भात याआधीच जपानने भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. “महाराष्ट्र सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याने जपानला चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे भविष्यात परदेशातून भारतात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीलाही फटका बसू शकतो,” असे मत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.

नक्की काय आहे हा मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

-अहमदाबाद आणि मुंबई शहरादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आधी २०२२ ठरवण्यात आली होती, पण आता ती २०२३ पर्यंत पुढे गेली आहे.

-या प्रकल्पाचं काम अधिकृतरीत्या सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आलं.

-सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन आहे. चाचणीवेळी या गाडीने १८० किमी प्रति तासापर्यंतचा वेग गाठला होता. तर जपानमधील बुलेट ट्रेन ३२० किमी प्रति तासापर्यंतच्या वेगानं धावू शकते.

-१,०४९ कोटींहून अधिक रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सूरत, अहमदाबाद आणि मुंबई ही भारतातील महत्त्वाची आर्थिक केंद्र या द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत.

-सध्या या जवळजवळ ५०० किमीच्या प्रवासाला आठ तास लागतात, जो बुलेट ट्रेनमुळे फक्त दोन तास सात मिनिटांत पूर्ण करता येईल.

-आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण १,३८० हेक्टर जमिनीपैकी ५४८ हेक्टर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. पालघरमध्ये लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 5:30 pm

Web Title: bullet train center sweats as shivsena slams on brakes scsg 91
Next Stories
1 “पी.चिदंबरम यांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती”
2 कांदा स्वस्त करण्यासाठी सरकारचा नवा उपाय, साठेबाजांवर आणले काही निर्बंध
3 भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांना मिळाली बुलेट ट्रेन प्रकल्पाची कंत्राटं
Just Now!
X