गुरूवारी ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एनएचएसआरसीएल) एका अधिकाऱ्यानं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकिटांच्या दराबाबत माहिती दिली. या मार्गावरील प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला जवळपास 3 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. परंतु हे बुलेट ट्रेनच्या तिकिटाचे दर हे विमानाच्या तिकिटांच्या दरापेक्षाही महाग असल्याचे दिसत आहे. मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी विमानासाठी जवळपास 2 हजार 200 रूपये मोजावे लागतात. तसंच हे अंतर कापण्यासाठी 1 तास 15 मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु बुलेट ट्रेनने हे अंतर कापण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागणार आहे.

‘एनएचएसआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन योजनेबद्दल माहिती दिली. “बुलेट ट्रेनसाठी आम्हाला 1 हजार 380 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यामध्ये खासगी, सरकारी, वन आणि रेल्वेच्या जमिनींचा समावेश आहे. आतापर्यंत 622 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. तसंच डिसेंबर 2023 ची मर्यादा ध्यानात ठेवून आम्ही काम करत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं. बुलेट ट्रेन पूर्ण झाल्यानंतर सकाळी 6 ते रात्री 12 यावेळेत मुंबई ते अहमदाबाद 35 आणि अहमदाबाद ते मुंबई 35 अशा 70 फेऱ्या होणार असून यासाठी जवळपास 3 हजार रूपये तिकिट दर आकारला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

बुलेट ट्रेनसाठी निविदा जारी करण्यात आल्या असून निर्मिती कार्य मार्च 2020 पासून सुरू होण्याची शक्यता खरे यांनी व्यक्त केली. बुलेट ट्रेन योजना पूर्ण होण्यासाठी तब्बल 1.08 लाख कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबर 2023 पर्यंत बुलेट ट्रेन पूर्ण करण्याचा मानस आहे. मुंबई ते अहमदाबाद 508 किलोमीटरचे अंतर असून यादरम्यान 12 स्थानकं असणार आहेत. सध्या ठरवण्यात आलेले बुलेट ट्रेनचे दर आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा विमानापेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे.