बुलेट ट्रेनवरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१३ मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगाला भारताची ताकद दाखवण्यासाठी बुलेट ट्रेनची गरज आहे. या बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशी बसणार नाही हे मलाही माहित आहे, असे मोदींंनी एका भाषणात म्हटले होते . या व्हिडिओवरुन मोदींवर टीका होत आहे.

मुंबईत २०१३ मध्ये इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत मोदींनी बुलेट ट्रेनवर भाष्य केले होते. ‘आपण नेहमी छोटा विचार करतो. चीनची सर्वत्र चर्चा होते, पण ते  नेहमी शांघाय दाखवतात, उर्वरित चीन कधीच दाखवले जात नाही’ असे मोदींनी म्हटले आहे.

मोदी पुढे म्हणतात, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर सैन्य शक्तिप्रदर्शन करते, सैन्याच्या ताफ्यातील क्षेपणास्त्रे जगाला दाखवली जातात. आम्हीदेखील शक्तिशाली आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असतो, आर्थिक बाबतीतही असे दाखवण्याची गरज आहे. जगाला भारताची ताकद दाखवण्याची आवश्यकता असल्याने मी पंतप्रधानांकडे अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन सुरु करण्याची मागणी केली. या ट्रेनमध्ये कोणी बसायला येणार नाही. पण ‘हम भी कूछ कम नही’ हे दाखवण्यासाठी हे करावं लागतं असे मोदी म्हणाले होते.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बुलेट ट्रेनसाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च करणाऱ्या केंद्र सरकारने आधी रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे असे मत प्रवासी मांडत आहेत. मनसेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला असून त्यापार्श्वभूमीवर मोदींचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.