देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडीमध्ये ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येनंतर आता कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा टॉमी याला ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स’ (HSA) येथे ठेवण्यात आले होते. येथे त्याची देखभाल केली जात होती. मात्र, रविवारी संध्याकाळी जवळपास ७ वाजेच्या दरम्यान टॉमीचा मृत्यू झाला.

भाटीया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर टॉमीला ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स’ येथे आणण्यात आलं होतं आणि त्याची योग्य ती काळजी घेतली जात होती. त्याच्या प्रकृतीतही सुधारणा झाली होती. पण काल संध्याकाळी अचानक त्याचा मृत्यू झाला अशी माहिती ‘हाउस ऑफ स्ट्रे एनिमल्स’चे संस्थापक संजय महापात्रा यांनी दिली.

टॉमीचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकतं. टॉमीच्या मृत्यूबाबतची माहिती बुराडी पोलीस आणि नोएडा पोलिसांना देण्यात आली आहे. महापात्रा म्हणाले की, रविवार संध्याकाळपर्यंत टॉमी ठिक होता, सर्वकाही सुरळीत होतं. मात्र अचानक ही दुर्दैवी घटना घडली. भाटीया कुटुबियांच्या मृत्यूचा धक्का हे कारण असू शकतं पण शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल असं ते म्हणाले.

बुराडी येथील संत नगरमध्ये १ जुलै रोजी सकाळी एकाच घरात ११ मृतदेह आढळले आणि एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये भाटिया कुटुंबातील सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. भाटिया कुटुंबाने रोजच्या प्रमाणे सकाळी सहा वाजता दुकान न उघडल्याने शेजाऱ्याने डोकावून पाहिलं असता त्यांना घरात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर ही घटना उघडकीस आली.
११ पैकी १० मृतदेह लाटकलेल्या अवस्थेत होते. तर इतरांपासून दूर एका वृद्ध महिलेचा मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता. या सगळ्यांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी बांधलेली होती. तर हात मागे बांधलेल्या स्थितीत होते.

मृतांची नावे-
नारायणदेवी (वय-७७), भावेश(वय-५०), ललित (वय-४५), सविता (वय-४८), टीना (वय-४२), प्रतिभा (वय-५७), प्रियांका (वय-३३), नीतू(वय-२५), मोनू (वय-२३), ध्रुव आणि शिवम (वय-15)