“जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर ज्याप्रमाणे त्याने त्या मुलीला जाळून मारलं तसचं त्यालाही मारलं पाहिजे. पीडित तरुणीही एका आईची मुलगी होती ना?,” असं मत हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या आईने व्यक्त केलं आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चिंताकुंता केशावुलूच्या आईने स्वत:चा मुलगा दोषी असल्यास त्याला जाळून टाकण्याची मागणी केली आहे.

हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर सामुहिक बलात्कार करून जाळल्याच्या प्रकरणी देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील जंतरमंतर येथील आंदोलनापासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हैदराबाद सामुहिक बलात्कारप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. यापैकी एकजण ट्रक चालक असून इतर तिघे क्लिनर म्हणून काम करतात. या प्रकरणासंदर्भात बोलताना एका आरोपीच्या आईने संपूर्ण प्रकराबद्दल संताप व्यक्त केला आहे. “मला आज या सर्व प्रकरणाचा त्रास होत असल्यानेच त्या मुलीच्या आईची काय परिस्थिती असेल याचा मी अंदाज बांधू शकते,” असं या महिलेनं म्हटलं आहे.

काय घडलं होतं

हैदराबादमधील शमशाबाद भागात २७ वर्षे वयाच्या पशुवैद्य महिलेवर २७ नोव्हेंबर रोजी तोंडापल्ली टोल प्लाझा येथील परिसरात चार ट्रक चालकांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिला ठार करून त्यांनी तिचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळून टाकला होता. तो जळालेला मृतदेह २८ नोव्हेंबरला सकाळी सापडला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढल्याचीही कबुली पोलिसांना दिली आहे.

ही घटनासमोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे.