लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याप्रकरणी स्वित्झर्लंडच्या एका मशिदीतील इमामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इमाम मुळचा इथियोपिया येथील आहे. त्याने शुक्रवारी मशिदीत जमलेल्या लोकांसमोर उपदेशपर भाषण केले. यावेळी त्याने जे मुसलमान धर्मातील परंपरांचे पालन करणार नाहीत, त्यांना जाळून टाका, असे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे समजते.

‘रशिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर २०१६ या दिवशी स्वित्झर्लंडच्या विंटरटुअर येथील अन नूर मशिदीत या इमामाकडून लोकांना चिथावण्यात आले. जे मुसलमान मशिदीत येऊन नमाज अदा करणार नाहीत, त्यांना मारून टाकले पाहिजे. नमाज अदा न करणाऱ्यांना या मुसलमानांना धर्मातून बहिष्कृत केले पाहिजे. एवढे करूनही ते नमाज आणि धर्मातील अन्य परंपरांचे पालन करत नसतील तर या मुस्लिमांना त्यांच्या घरात जाऊन जाळले पाहिजे, असे प्रक्षोभक वक्तव्य या इमामाने केले.

दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून या इमामाचे नाव अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. या इमामावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल झाले होते. त्याने सोशल मीडियावरून हत्येचे क्रूर वर्णन केले होते. तसेच विनापरवाना स्वित्झर्लंडमध्ये काम करत असल्याचा गुन्हाही त्याच्या नावावर होता. दरम्यान, मशिदीत त्याने केलेल्या प्रक्षोभक भाषणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २०१६ मध्येच या इमामाला ताब्यात घेतले होते. तेव्हापासून तो तुरूंगात आहे.

दरम्यान, ज्या मशिदीत हा प्रकार घडला त्या मशिदीच्या प्रशासनाकडून काही कट्टरपंथीयांना मदत दिली गेल्याचाही आरोप आहे. त्यामुळे या मशिदीवर अनेकदा छापेही टाकण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ज्या इमारतीमध्ये ही मशीद आहे, त्याने मशिदीसाठीचा भाडेकरार वाढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे जूनच्या अखेरीस ही मशीद बंद करण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईत संबंधित इमाम दोषी आढळल्यास त्याची रवानगी इथियोपियाला करण्यात येईल. तसेच त्याच्यावर स्वित्झर्लंडमध्ये येण्यास १५ वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.