म्यानमारमध्ये काही महिन्यांपूर्वी उद्भवलेल्या बौद्ध विरुद्ध मुस्लीम संघर्षांचे लोण आता श्रीलंकेत पोहोचले आहे. बौद्ध राष्ट्रवादी गटाने मध्य कोलंबोतल्या मुस्लीमबहुल भागातील एका मशिदीची तोडफोड करून मुस्लीम नागरिकांवर हल्ले केल्याच्या कथित घटनेमुळे श्रीलंकेत सध्या तणावाचे वातावरण आहे. तशात तमिळींचे प्राबल्य असलेल्या उत्तर प्रांतात पुढच्या महिन्यात निवडणूक होणार असून, सिंहली-तमिळी संघर्षांचा इतिहास पाहता या निवडणुका कशा पार पडतात याबद्दल अनेकांच्या मनात भयशंका आहे.
श्रीलंकेत बौद्ध एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के आहेत. परंतु मुस्लिमांची वाढती लोकसंख्या, व्यापार-उदिमातील वाढते वर्चस्व तसेच बौद्धांचे सक्तीने धर्मातर होत असल्याची भावना यामुळे त्यांच्या मनात आपल्या अस्तित्वाबाबत भीती निर्माण झाल्याचे दिसते. त्या असुरक्षिततेच्या भावनेतूनच गेल्या एक दीड वर्षांपासून मुस्लीम नागरिकांची घरे, व्यापारी संकुले यांवर हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.  
श्रीलंकेत बौद्ध धर्मासह हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांचे वास्तव्य आहे. २०११च्या जनगणनेनुसार श्रीलंकेतील एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के मुस्लीम आहेत. १९८१ ते २०११ या काळात मुस्लिमांची संख्या ७८ टक्क्यांनी वाढली असून, मुस्लीम लोकसंख्या १.०४ दशलक्षांवरून १.८६ दशलक्ष इतकी झाली. याच काळात श्रीलंकेतील लोकसंख्येत सर्वात मोठा घटक असणाऱ्या सिंहली बौद्ध धर्मीयांची संख्या ३८ टक्क्यांनी वाढून १०.९ दशलक्षांवरून १५.८ दशलक्ष इतकी झाली आहे. श्रीलंकेतील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांची संख्या दिवसेंदिवस फुगत असल्याचा बौद्ध धर्मीयांचा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे व्यापारात मुस्लिमांचे वर्चस्व वाढत असून स्थानिक सिंहलींच्या जमिनीही त्यांच्याकडून बळकावल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बौद्ध धर्मात पशूहत्येला बंदी आहे. पशूचा छळ करणेही पाप असल्याचे मानले जाते. या गोष्टीवरूनही बौद्ध धर्मीयांमध्ये मुस्लिमांविरोधात नाराजी असल्याचे बोलले जाते. मुस्लीम समुदायाकडून सिंहली बौद्धांचे खच्चीकरण करण्यात येत, त्यांचे सक्तीने धर्मातरही केले जाते, अशाही ‘बोडू बाला सेना’ या बौद्ध राष्ट्रवादी गटाच्या तक्रारी आहेत. त्यातूनच त्यांनी मुस्लिमांविरोधात ही आक्रमक मोहीम चालविल्याचे बोलले जाते. मात्र नुकत्याच झालेल्या मशिदीवरील हल्ल्याचा या सेनेने स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. असा आरोप करून बौद्ध धर्मीयांना बदनाम करण्यात येत असल्याचे सेनेचे म्हणणे आहे. श्रीलकां मुस्लीम परिषदेला मात्र ते अमान्य आहे. गेल्या वर्षभरात २०पेक्षा अधिक मशिदींवर अशा प्रकारे हल्ले करण्यात आल्याचा आरोप परिषदेचे अध्यक्ष एन. एम. अमीन यांनी केला आहे.
एकीकडे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लीम समुदायांमधली वाद चिघळलेला असतानाच दुसरीकडे श्रीलंका सरकारने तमिळींचे प्राबल्य असलेल्या युद्धग्रस्त उत्तर प्रांतात निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या २१ सप्टेंबर रोजी तमिळबहुल प्रांतात निवडणूक होणार आहे.
स्वतंत्र तामिळ राज्याची मागणी करणाऱ्या तामिळ बंडखोरांनी श्रीलंका सरकारविरोधात युद्ध छेडले आणि दोन दशके चाललेल्या या वांशिक युद्धाचा शेवट २००९ मध्ये झाला. आता चार वर्षांनंतर येथे प्रथमच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रपती राजेपक्षे यांनी तामिळबहुल प्रांताला अधिक स्वायत्तता देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र भारतासह अनेक राष्ट्रांना श्रीलंका सरकारच्या भूमिकेबद्दल संशय आहे. त्यामुळे या निवडणुका अधिक पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय प्रयत्नशील आहे. त्यामुळे निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर स्थानिक तामिळींना योग्य तो न्याय मिळेल का, अन्यथा अस्तित्वासाठी पुन्हा संघर्षांची ठिणगी पडेल, हे येणारा काळच स्पष्ट करील.