अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. असा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
डेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी बुरखा आणि निकाब बंदीचे विधेयक ७५ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा आपला हेतू नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी आणि पारंपारिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही. डेन्मार्कमध्ये काही मुस्लिम महिला संपूर्ण शरीर आणि चेहरा झाकणारी वस्त्रे परिधान करत होती. या निर्णयामुळे यापुढे डेन्मार्कमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा आणि निकाब परिधान करता येणार नाही.
येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या कायद्याची कशी अंमलबजावणी करायची ते पोलिसांवर अवलंबून आहे असा डेन्मार्कचे न्यायमंत्री सोरेन पोयुलसेन यांनी सांगितले. या कायद्यानुसार योग्य कारण असेल तर लोकांना त्यांचा चेहरा झाकून ठेवण्याची परवानगी आहे. उदहारणार्थ कडाक्याची थंडी, बाईक चालवताना लोकांना त्यांचा चेहरा झाकता येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १हजार क्रोनर (डेन्मार्क चलन) दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन करताना पकडले तर १० हजार क्रोनरचा दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 12:16 pm