श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात येणार असून एक हजाराहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार आहेत, असे श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर यांनी शनिवारी सांगितले. या निर्णयाचा देशातील अल्पसंख्य मुस्लीम समाजावर परिणाम होणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुरख्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी आपण स्वाक्षरी केली असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, असे वीरशेखर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी मुस्लीम महिला आणि मुली बुरखा वापरत नव्हत्या, हे धार्मिक दहशतवादाचे लक्षण असून ही पद्धत अलीकडेच आली आहे, त्यामुळे आम्ही बुरख्यावर बंदी घालणारच आहोत, असेही ते म्हणाले. इस्लामी दहशतवाद्यांनी चर्च आणि हॉटेलांवर दहशतवादी हल्ले केल्यानंतर २०१९ मध्ये बुरख्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

जमात-ए-इस्लामीच्या माजी म्होरक्याला अटक

श्रीलंकेमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून जमात-ए-इस्लामी या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या एका माजी म्होरक्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

रशीद हज्जूल अकबर (६०) असे या दहशतवाद्याचे नाव असून तो २०१९ पर्यंत २४ वर्षे जमात-ए-इस्लामीचा म्होरक्या होता. त्याला देमातागोडा येथून दहशतवाद तपास विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या मासिकामध्ये लेख प्रकाशित करून अकबर श्रीलंकेत जिहादी विचारसरणीला प्रोत्साहन देत होता, असे पोलिसांनी सांगितले.