राजधानी दिल्लीतला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक बुरखाधारी महिला गोळ्या झाडताना दिसत आहे. ही महिला एका दुकानाच्या शटरवर धाडधाड गोळ्या झाडत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेने दुकानाच्या शटरवर एकामागोमाग एक चार गोळ्या चालवल्या. त्यानंतर घटनास्थळावरुन ती फरार झाली. सुदैवाने इतर कोणलाही गोळी लागली नाही, पण त्यावेळी कोणीतरी महिलेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ईशान्य दिल्लीतील चौहान बांगर परिसरातील आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ १८ नोव्हेंबरच्या रात्रीचा असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. व्हिडिओमध्ये आरोपी महिला गोळ्या झाडताना दुकानदाराला शिवीगाळ करतेय. तसंच, मी गँगस्टर नासिरची बहिण आहे असं ओरडताना दिसतेय. आरोपी महिला दारूच्या नशेत होती आणि मोबाइल फोन दुरूस्त करण्यावरून तिचे दुकान मालकाशी भांडण झाले होते, त्या रागातून तिने गोळ्या चालवल्या अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला जाफराबाद परिसरातून अटक केली. पोलिसांनी सांगितले की, महिलेचे नाव नुसरत असून ती जाफराबाद येथील रहिवासी आहे. ती मोहसिनची बहीण असून, तो त्या भागातील नासिर गँगचा सदस्य आहे. पोलिसांकडून आरोपी महिलेकडे तिच्याकडे पिस्तूल कशी आली याबाबत चौकशी सुरू आहे.