भारत-बांगलादेश यांच्यात नवीन बससेवेची आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समपदस्थ शेख हसीना वाजेद तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन बसगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवला. कोलकाता-ढाका-आगरताळा व ढाका-शिलाँग व गुवाहाटी या मार्गाने जाणाऱ्या दोन बस सोडण्यात आल्या. त्या पश्चिम बंगालला ईशान्येकडील राज्यांशी जोडणार आहेत. दोन्ही गाडय़ा ढाका मार्गे जाणाऱ्या आहेत. मोदी यांनी आगरताळा-ढाका-कोलकाता गाडीचे प्रतीकात्मक तिकीट शेख हसीना यांना दिले तर शेख हसीना यांनी ढाका-शिलाँग-गुवाहाटी गाडीचे प्रतीकात्मक तिकीट मोदी यांना दिले.
ममता बॅनर्जी यांनी कोलकाता-ढाका-आगरताळा बसचे प्रतीकात्मक तिकीट शेख हसीना यांना दिले. लोक-लोक पातळीवर संपर्क वाढवण्यासाठी ही बससेवा उपयोगी पडणार आहे.
कोलकाता-आगरताळा-ढाका या मार्गावर दोन बस धावतील. एक बस पश्चिम बंगाल सरकारची तर दुसरी त्रिपुरा सरकारची असेल. ढाका-शिलाँग-गुवाहाटी मार्गावर एकच बस असेल व ती बांगलादेश सरकारची असेल, या बस आठवडय़ातून तीनदा गुवाहाटी व ढाका येथून एकेकदा बस सोडण्यात येतील. या दोन्ही सेवांचा फायदा ईशान्येकडील राज्यांना होणार आहे.
कोलकाता-ढाका-आगरताळा सेवेने पश्चिम बंगाल व त्रिपुरा यांच्यातील अंतर ५६० कि.मी.ने कमी होणार आहे, सध्या ढाका-कोलकाता व ढाका-आगरताळा अशा दोन वेगळ्या बस आहेत.भारत व बांगलादेश रेल्वे सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी १९६५ मध्ये असलेले रेल्वे मार्ग परत सुरू करावे लागतील. आता भारताची जहाजे बांगलादेश मार्गे सिंगापूरला जाऊ शकतील असा करार करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:02 am