चीनमधील  करोना विषाणूच्या साथीचे केंद्र असलेल्या वुहानमध्ये बुधवारी बससेवा नऊ आठवडय़ांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. वुहानमधील बससेवा २३ जानेवारीनंतर प्रथमच सुरू करण्यात आली असून हाँकाऊ स्टेशन येथून पहाटे ५.२५ वाजता पहिली बस सुटली. एकूण ११७ बस मार्ग सुरू करण्यात आले असून तीस टक्के बस सेवा सुरू करण्यात आली आहे.  प्रत्येक बसमध्ये चालकाबरोबर सुरक्षा देखरेख करणारे अधिकारी उपस्थित आहेत.

वुहान व हुबेई प्रांतामधील ग्रीन हेल्थ कोड असलेल्या लोकांना शहर सोडून जाण्यास परवानगी दिली असून  २३ जानेवारीपासून वुहानमध्ये बंदी लागू करण्यात आली होती. नंतर हे निर्बंध सगळ्या हुबेई प्रांतात लागू केले होते. देशात ४७ नवीन परदेशी रुग्ण  सापडले असून त्यामुळे विषाणूच्या साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने मंगळवारी तीन महिन्यांची बंदी उठवली असून मध्य हुबेई प्रांतातील ५.६ कोटी लोकांनी आता सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमध्ये सगळे व्यवहार सुरू करण्यास ८ एप्रिलपर्यंत वाट  पाहावी लागणार आहे.

वुहानची लोकसंख्या १.१ कोटी आहे. हुबेई व वुहान येथे मंगळवारी नवीन रुग्ण सापडले नसून चार बळी गेले आहेत, त्यामुळे मृतांची संख्या ३२८१ झाली आहे. चीनमध्ये देशांतर्गत रुग्णांची संख्या वाढलेली नसली तरी परदेशी रुग्णांमुळे धोका अजून कायम आहे. ४७ नवीन परदेशी रुग्ण सापडले असून त्यांची एकूण संख्या ४७४ झाली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अनेक चिनी नागरिक परदेशातून येत आहेत. ४२७ निश्चित परदेशी रुग्णांमध्ये ३८० चिनी नागरिक असून ४७ परदेशी नागरिक आहेत. मंगळवारी चार बळी गेले असून ३३ नवीन संशयित रुग्ण सापडले आहेत. तीन मृत्यू हे हुबेई प्रांतात झाले. मंगळवारी रुग्णांची संख्या ८१,२१८ झाली असून त्यात ३२८१ मृतांचा समावेश आहे.