गंमत म्हणून विमानात अपहरणाच्या धमकीचं पत्र ठेवणाऱ्या व्यावसायिकाला अहमदाबादच्या विशेष एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. देशात विमान अपहरण विरोधी कायद्यातंर्गत झालेली ही पहिली शिक्षा आहे. २०१७ साली बीरजू किशोर साल्लाने मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात अपहरणाची चिठ्ठी ठेवली होती.
विमानात अपहरणकर्ते आणि स्फोटके असल्याचे त्याने पत्रात लिहिले होते. बीरजू साल्लाने पद्धतशीरपणे हा कट रचला होता. त्याने कसे धमकीचे पत्र बनवले ते सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. २३ जानेवारीला त्याच्या विरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रात या सर्व गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या.
पाच कोटीच्या दंडाच्या रक्कमेपैकी वैमानिक आणि सहवैमानिकाला प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे निर्देश त्याला कोर्टाने दिले आहेत. चिठ्ठी सापडल्यानंतर ३० ऑक्टोंबर २०१७ रोजी अहमदाबाद विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. बीरजू किशोर साल्लाला दोन हवाई सुंदरीने प्रत्येकी ५० हजार तर क्रू मेंबरपैकी प्रत्येकाला २५ हजार रुपये देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
धमकीचे पत्र सापडले त्यावेळी विमानात ११५ प्रवासी आणि सात क्रू मेंबर होते. आरोपीने त्याच्या मुंबईतील ऑफीसमध्ये लॅपटॉपवर धमकीचे पत्र टाईप करुन कार्यालयातच प्रिंट आऊट काढली. विमानात स्वच्छतागृहातील टीश्यू पेपर बॉक्समध्ये त्याने हे पत्र ठेवले होते असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 5:23 pm