मोदी सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं वक्तव्य उद्योगपती राहुल बजाज यांनी केल्यानंतर अनेकजण सरकारविरोधात आवाज उठवत असल्याचं दिसत आहे. बायोकॉनच्या एमडी किरण मजूमदार शॉ यांनदेखील सरकारप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यामध्ये अजून एक नाव जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक कविता शेअर करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

हर्ष गोयंका यांनी मंगळवारी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गोरखनाथ पांडे यांची एक कविता शेअर करत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. ही कविता ट्विट केल्यानंतर काही वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

हर्ष गोयंका यांच्या ट्विटमध्ये काय लिहिलं होतं –
हालात देखते हुए कुछ पंक्तियां याद आती है…
राजा बोला रात है,
रानी बोली रात है,
मंत्री बोला रात है,
संतरी बोला रात है,
सब बोले रात है,
यह सुबह सुबह की बात है |

रवीश कुमार यांनी केलं होतं ट्विट शेअर – 

हर्ष गोयंका यांचं हे ट्विट पत्रकार रवीश कुमार यांनीदेखील शेअर केलं होतं. तसंच गेल्यावेळी केलंत तसं यावेळी ट्विट डिलीट करु नका असंही म्हटलं होतं.

राहुल बजाज यांनी काय टीका केली होती ?
देशात सध्या भीतीचे वातावरण बनले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. एका चर्चात्मक कार्यक्रमामध्ये बजाज यांनी आपली भुमिका मांडली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते.

बजाज म्हणाले, “सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो”.