कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना ग्राहकांबरोबरच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत कारण त्यांना विधानसभा निवडणुकीची चिंता आहे. आता दीक्षित यांनी निवडणूक आचारसंहिता बाजूला ठेवून स्वस्त दरात कांदा वाटप करण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.
सध्या कांद्याचे भाव दिल्लीत १०० रू किलो असून  अन्नमंत्री के.व्ही.थॉमस व कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी दीक्षित यांनी कांद्याच्या प्रश्नावर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५० रू. किलो दराने कांदा दिल्लीत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. देशांतर्गत बाजारातून दिल्लीला कांदा आणला जात आहे. पवार यांनी सांगितले की, कांद्याची टंचाई तात्पुरती आहे, खूप पावसाने कर्नाटक व महाराष्ट्रात कांद्याचे नुकसान झाले. गेल्या वर्षीपेक्षा जास्त भूभागात कांदा पेरला होता, त्यामुळे उत्पादनात घट येणार नाही, असे पवार म्हणाले.
 दीक्षित म्हणाल्या की, परिस्थिती गंभीर आहे. कांद्याच्या किमती स्थिर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. निवडणूक आयोगाकडे गाडय़ांवर कांदे विकण्याची परवानगी मागितली आहे. व्यापारी व साठेबाज परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. नाफेडला ना नफा तोटा तत्त्वावर कांदा देण्यास सांगितले आहे. १९९८ मध्ये काँग्रेसने कांद्याच्या प्रश्नावर स्वार होऊन भाजप सरकारचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. अन्न मंत्री थॉमस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ५० रू. किलो दराने कांदा पाठवून देतो असे आश्वासन दिले. दिल्ली सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने कांद्याचा प्रमुख उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्य़ात धाव घेतली असून तेथे ते कांद्याची खरेदी करीत आहेत. पवार यांनी मात्र दीक्षित यांना पुण्यातून कांदा खरेदी करा असा कानमंत्र दिला आहे. पवार यांनी लगेच बैठकीतूनच पुण्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना फोन केला. पुण्यातील बाजार दिल्लीला ३५ ते ४० रू. किलो दराने दोन दिवसांत कांदा देण्यास तयार आहे.