२०५० मध्ये जगभरात लोकसंख्येनुसार हिंदू तिसऱया स्थानावर येणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. यासंबंधीचा अहवाल प्यू संशोधन केंद्राने नुकताच प्रकाशित केला असून यामध्ये जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये जगभरात हिंदूंची आकडेवारी ३४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०५० सालापर्यंत जगातील हिंदूंचे प्रमाण १४.२ टक्के इतके असणार असून लोकसंख्येनुसार जगभरात हिंदू तिसऱया स्थानावर असतील. त्याखालोखाल कोणत्याही धर्माचे अनुकरण न करणाऱयांचा नंबर लागेल आणि हे प्रमाण १३.२ टक्के इतके असेल. आगामी ४० वर्षांत ख्रिश्चन धर्म हा पहिल्या स्थानावरच कायम राहील तर, याच काळात मुस्लिम धर्मियांची झपाट्याने वाढ होईल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०५० पर्यंत जगातील मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर आगामी काळात असाच कल कायम राहिल्यास २०७० पर्यंत इस्लाम धर्म जगातील सर्वात विश्वासू आणि लोकप्रिय धर्म होईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.