27 November 2020

News Flash

१० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक

मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई; बिहारच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही मतदान

| November 3, 2020 12:05 am

(संग्रहित छायाचित्र)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ९४ जागांच्या दुसऱ्या टप्प्याबरोबर, मंगळवारी १० राज्यांतील विधानसभेच्या ५४ जागांसाठीदेखील मतदान होत आहे. मध्य प्रदेशमध्ये २८ व गुजरातमध्ये ८ तर, उत्तर प्रदेशमध्ये ७ अशा तीन राज्यांतील ४३ जागांवर पुन्हा कौल घेतला जाणार आहे.

कर्नाटक, ओडिशा, झारंखड, नागालँड या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन तर, तेलंगण, हरियाणा, छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक जागांवर निवडणूक लढवली जात आहे. मणिपूरमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होणार असली तरी त्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. सर्व पोटनिवडणुकांचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील.

मध्य प्रदेश व गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा निवडणूक घेतली जात आहे. त्यापैकी मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २५ समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २३० सदस्यांच्या विधानसभेत भाजपकडे १०७ जागा असून त्यांना बहुमतासाठी ९ जागांची गरज आहे. तर, काँग्रेसकडे ८७ जागा असून पक्षाला पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी २८ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला किमान २१ जागा जिंकाव्या लागतील आणि त्यानंतर बसप व अपक्ष आमदारांची मदत घेता येईल. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये ही पोटनिवडणूक अटीतटीची झाली असून विद्यमान मुख्यमंत्री शिवराज चौहान, ज्योतिरादित्य शिंदे तसेच, कमलनाथ यांचे नेतृत्व पणाला लागले आहे.

उत्तर प्रदेशमधील सात जागांपैकी सहा जागा भाजपने २०१७च्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या. भाजपचे आमदार कुलदीप सेनगर बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यत दोषी ठरल्याने तिथेही पोटनिवडणूक होत आहे. हाथरस प्रकरणामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव वाढला असल्याने त्यांच्यासाठीही या जागा जिंकणे महत्त्वाचे बनले आहे. योगी सरकारवर दलितांची नाराजी वाढत असताना बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या उलटसुलट विधानांमुळेही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वेळ पडली तर भाजपला मतदान करू, असे विधान करणाऱ्या मायावती यांनी घूमजाव केले. मी राजकारणातून निवृत्त होईन पण भाजपशी आघाडी करणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देऊन भाजपला मदत केली होती. १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपकडे १०३ चे संख्याबळ असल्याने या निवडणुकीतील निकालामुळे भाजप सरकारला कोणताही धोका नाही. अन्य राज्यांमध्ये काही जागा विद्यमान आमदाराच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी दुमका विधानसभा मतदारसंघ सोरेन यांनी सोडल्याने पोटनिवडणूक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:05 am

Web Title: by elections today for 54 seats in 10 states abn 97
Next Stories
1 अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत देशाचे अस्तित्वच पणाला
2 न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री
3 भाजप-बसप यांची युती अशक्य
Just Now!
X