आरोग्यमंत्र्यांचा आशावाद; सर्व राज्यांना समन्यायी वाटपाची ग्वाही

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत  २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीकरणात करोना साथनियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. लशीचे डोस तयार झाल्यानंतर सर्व राज्यांना योग्य आणि न्याय्य पद्धतीने त्यांचे वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिली.

लसीकरणासाठी प्राधान्य असलेल्या लोकसमूहांच्या याद्या राज्यांनी ऑक्टोबरअखेपर्यंत केंद्राला देणे अपेक्षित आहे. या याद्यांमध्ये साथ नियंत्रणाच्या आघाडीवर काम करणारे सरकारी आणि खासगी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कर्मचारी, रुग्ण- संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणारे, चाचण्या करणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आदींचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लशीच्या ४०-५० कोटी मात्रा जुलै २०२१पर्यंत उपलब्ध होतील. त्यातून सुमारे २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज आहे. लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

समाजमाध्यमांवरील आपल्या अनुयायांशी संवाद साधताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर होईल. त्याचबरोबर लशीची नितांत आवश्यकता असलेल्या लोकांपर्यंत ती पोहोचावी आणि काळाबाजार  होऊ नये, यासाठी लशीच्या वितरणापर्यंत केंद्र सरकारमार्फत देखरेख ठेवण्यात येईल. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालय सध्या एक नमुना तयार करीत असून त्याद्वारे राज्ये लसीकरणात प्राधान्य देण्यात येणाऱ्या लोकसमूहांच्या याद्या सादर करतील. लसीकरणाच्या प्राधान्यक्रम याद्या बनवण्याचे काम ऑक्टोबरअखेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

लस तयार झाल्यावर योग्य आणि न्याय्य वितरण व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालय सध्या २४ तास काम करीत आहे. निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करीत आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.

शीतपेटय़ांच्या सुविधेसह लसीकरणासाठी अगदी खालच्या स्तरापर्यंत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती देण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लसीकरणासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या योजनेवरही केंद्र सरकार काम करीत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

देशात तयार होणाऱ्या विविध लशींच्या उपलब्धतेचे वेळापत्रक, उत्पादकांकडून लशीच्या जास्तीतजास्त मात्रा मिळवणे, पुरवठा साखळीची उभारणी आणि अतिजोखमीच्या नागरिकांच्या लसीकरणास प्राधान्य यावर उच्चस्तरीय समिती काम करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. लस तयार होईपर्यंत लसीकरणाचे सर्व नियोजन पूर्ण होईल आणि त्यानंतर लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णसंख्या ६५ लाखांवर : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. त्यातील ५५ लाखांहून अधिक जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ८४.१३ टक्के आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ९४० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना बळींची एकूण संख्या १,०१,७८२ वर पोहोचली. देशभरात ९,३७,६२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डॉक्टर, परिचारिकांना प्राधान्य 

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात साथ नियंत्रणाच्या आघाडीवर काम करणारे सरकारी आणि खासगी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कर्मचारी, रुग्ण- संशयित रुग्ण चाचण्या करणारे कर्मचारी आदींना प्राधान्य.

* उच्चस्तरीय समितीमार्फत लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू

* योग्य आणि न्याय्य वितरणासाठी आणि वितरणातील काळाबाजार टाळण्यासाठी केंद्र सरकार दक्ष

* लसीकरणासाठी प्राधान्यक्रम याद्या बनवण्याचे काम ऑक्टोबरअखेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

* राज्यांना नागरिकांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याबाबत सूचना

देशात तयार होणारी कोणती लस प्रभावी असेल, यावर आताच भाष्य करणे शक्य नाही. परंतु आपल्याकडे तयार होणाऱ्या लशी सुरक्षित असतील.

डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री