पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना आता काश्मिरमधील फुटिरतावादी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनने आपले डोके वर काढले आहे. मंगळवारी हिज्बुलकडून आत्मघाती हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. स्थानिक काश्मिरी तरुणांसाठी जर करो किंवा मरोची स्थिती निर्माण झाली तर हे तरुण स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाहीत, असे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

आपल्याच देशातील एका दहशतवादी संघटनेकडून भारतीयांना अशा प्रकारे इशारा देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आजवर अशा प्रकारचे हल्ले बंदी असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेकडून करण्यात आले आहेत. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाच दिवसांनी हिज्बुलने ही धमकी दिली आहे. १७ मिनिटांच्या एक ऑडिओ क्लिपद्वारे हिज्बुलने हा इशारा दिला आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

या क्लीपमध्ये हिज्बुलचा ऑपरेशनल कमांडर रियाझ नायकूने म्हटले आहे की, पुलवामात जे काही झालंय ते इथल्या लोकांवर होत असलेल्या अत्याचाराची परिणीती आहे. जोपर्यंत तुमचं सैन्य काश्मीरमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या सैनिकांसाठीच्या शवपेट्या भरतच राहतील आणि तुम्हाला रडावेच लागेल. आम्ही मरायला तयार आहोत मात्र तुम्हालाही जिवंत सोडणार नाही, असेही नायकूने म्हटले आहे. नायकू हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी आहे.

नायकू पुढे म्हणतो, भारत सरकारने काश्मीरच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. स्वातंत्र्य हे काश्मिरी तरुणांचे पॅशन आहे. त्यासाठी आम्ही बलिदान देण्यासाठीही तयार आहोत. आम्ही शरण येण्याऐवजी मरण पत्करु. तो दिवस आता दूर नाही जेव्हा आमची १५ वर्षांची मुले त्यांच्या शरीरावर स्फोटकं लावून तुमच्या सैन्याच्या वाहनांखाली घुसतील.  जगातील कुठलीच शक्ती अशा प्रकारचे हल्ले थांबवू शकत नाही.

कालच लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल कवलजितसिंग धिल्लन यांनी सीआरपीएफसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले होती की, अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला काश्मीरमध्ये बऱ्याच काळानंतर झाला आहे. तसेच काश्मिरी मातांनी आपल्या मुलांना दहशतवादी कंपूत सामिल होण्यापासून रोखावे जे आहेत त्यांना शरणागती पत्करण्यास सांगावे अन्यथा आम्ही त्यांना सरळ गोळ्या घालू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर हिज्बुलची ही प्रतिक्रिया आली आहे.