देशात पाच राज्यांच्या निवडणुकांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडु, केरळ आणि पुदुच्चेरीत मतमोजणी सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. यात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांचा समावेश आहे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर कर्नाटकातील बेळगाव लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर आंध्र प्रदेशातील तिरूपती लोकसभेची जागेवर पोटनिवडणूक पार पडली. वायएसआर काँग्रेस पार्टीचे खासदार बी दुर्गाप्रसाद यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागेवर १७ एप्रिलला मतदान झालं होतं.

या व्यतिरिक्त ११ राज्यातील १४ विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक पार पडली होती. त्यासाठी आज मतमोजणी होत आहे. राजस्थानच्या सहारा, सुझानगड आणि राजसमंद, कर्नाटकच्या बसवकल्याण आणि मस्की, गुजरातच्या मोरवा हदफ, झारखंडच्या मधुपूर, मध्य प्रदेशच्या दमोह, महाराष्ट्रातील पंढरपूर, मिझोरमच्या सरछिप, नागलँडच्या नोकसेन, ओडिशाच्या पिपिली, तेलंगाणातील नागार्जुन आणि उत्तराखंडच्या सल्ट विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या ठिकाणी १७ एप्रिलला मतदान झालं होतं.

West Bengal Election 2021 Result Live Updates: तृणमूल आणि भाजपामध्ये कडवी झुंज

पंढरपूरमध्ये भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट लढत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक झाली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ असेल, याची उत्सुकता सध्या लागली आहे. त्याशिवाय, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचं दिसून येत आहे.