देशातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, भारतीय सनदी लेखाकार संस्था अर्थात ICAI ने आपली पहिल्या टप्प्यातली परीक्षा रद्द केली आहे. २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान CA च्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसोबत घेतली जाईल अशी माहिती ICAI च्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर दिली.

देशातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता ICAI ने परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना Opt-out चा पर्याय दिला होता. मात्र पहिल्या टप्प्यात परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय अन्यायकारक असल्याचा आरोप करत काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी देशभरात परीक्षाकेंद्र वाढवून देण्यासोबत आणि काही मुद्द्यांवर आपला आक्षेप नोंदवला. ज्याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील अलोक श्रीवास्तव यांना आपली बाजू ICAI कडे थेट मांडण्याची मूभा असल्याचं सांगितलं.

२९ जूनररोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सीएच्या परीक्षेचं आयोजन करताना नियमांमध्ये शिथीलता आणण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. देशातली करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि उमेदवारांच्या तब्येतीची काळजी लक्षात घेता, परीक्षाकेंद्र निवडण्याचा अधिकार उमेदवारांना मिळायला हवा असंही मत न्यायालयाने नोंदवलं होतं. मात्र उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर ICAI ने मे महिन्यातल्या पहिल्या टप्प्यातली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.