ईशान्य दिल्लीत जाफराबाद येथे सुधारित नागरिकत्व कायद्या(सीएए) व एनआरसीच्या मुद्यावरून आज (सोमवार) पुन्हा एकदा हिंसचार उफळला. सोमवारी दुपारी या कायद्याचे समर्थक आणि विरोधक हे पुन्हा एकदा समोरासमोर आले. यावेळी तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. याशिवाय एका पोलीस अधिकाऱ्यासही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीस अश्रुधाराचा नळकांड्या देखील फोडल्या. यावेळी आंदोलकांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, परिसरातील तीन वाहनं देखील पेटवून देण्यात आली आहेत. शिवाय, समाजकंटकांडून काही दुकानं जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

मौजपूर परिसरात देखील सलग दुसऱ्या दिवशी सीएएचे आंदोलक व समर्थकांमध्ये मोठा वाद उफळला. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह १५ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मौजपूरकडे येणारे मार्ग काही काळासाठी बंद केले आहेत. येथील वातारवण अतिशय तणावग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर रेल्वेस्टेनशची प्रवेशद्वारं देखील बंद केली गेली आहेत. या स्टेशनवर रेल्वे थांबणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.