नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुरू असलेल्या विरोधानं काही ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. आंदोलनाच्या नावाखाली हिंसक झालेल्या जमावाचा एक व्हिडीओ गुजरातमधील अहमदामधून समोर आला आहे. आंदोलनानंतर काही पोलीस कर्मचारी परत जात असताना काही उपद्रव्यांनी त्यांना घेरत त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना गुरूवारी घडली. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी स्वत:ला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अहमदाबादमधील शाह आलम परिसरात ही घटना घडली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी ३२ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंसक आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. या घटनेत १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गुरूवारी गुजरात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. पालनपुरमध्येही हजारो जण रस्त्यावर उतरल्यानं रस्ता बंद झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर परिस्थिती चिघळली आणि काही आंदोलकांनी पोलिसांच्या गाडी उलटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अहमदाबाद पालनपुर महामार्ग बंद करण्यात आला होता.