सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) बद्दल जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता विशेष दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला.

यावेळी माहिती देताना यादव म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल विरोधकांसह प्रामुख्याने काँग्रेसकडून देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपा विरोधकांच्या या खोटारड्या राजकारणास जनतेसमोर उघड करण्यासाठी दहा दिवस विशेष जनजागृती अभियान देशभर राबवणार आहे. या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा अधिक कुटुंबासी संपर्क साधला जाणार आहे.

याचबरोबर जनजागृती अभियानातंर्गत प्रत्येक जिल्ह्यात रॅली व सभांचे देखील आयोजन केले जाणार आहे. २५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजपाकडून पत्रकारपरिषदा घेतल्या जाणार आहेत. अनेक महाविद्यालयांसह विद्यापीठांकडून या कायद्यास पाठिंबा दर्शवण्यात आला असल्याचेही यादव यांनी यावेळी सांगितले.