सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला. दिल्लीमधील न्यू फ्रेण्ड्स कॉलनी परिसरामध्ये ही धुमश्चक्री झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे तर दुसरीकडे बाहेरील लोकांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्याचे सांगून कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. या हिंसाचारानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

या आंदोलनात अनेक विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि समालोचक आकाश चोप्रा या दोघांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पठाणने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आहे. “राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील, पण ‘जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांबद्दल मी आणि माझा देश अधिक चिंतित आहे”, असे ट्विट इरफानने केले.

याशिवाय, समालोचक आकाश चोप्रा यानेही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. “संपूर्ण देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये घडत असलेल्या भयावह प्रकाराचे व्हिडीओ पाहून खूपच चिंता वाटते. हे विद्यार्थी आपल्यातील एक आहेत. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहे. बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना गप्प केल्याने भारत कधीच महान होणार नाही. याउलट अशा प्रकारांनी हे विद्यार्थी देशाच्या विरोधात विचार करू लागतील”, असे आकाश चोप्राने ट्विटमध्ये नमूद केले.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रविवारी झालेल्या आंदोलनात जामिया मिलिया इस्लामियाच्या दोन विद्यार्थ्यांना गोळी लागल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, मुंबई विद्यापीठ या सह देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. सोमवारीही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत ‘जामिया’तील कारवाईवर निषेध नोंदवला आहे.