मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांमागे हिंदू- मुस्लीम भेदाभेद करण्याचा हेतू नसून काही लोकांनी राजकीय गैरफायदा घेण्यासाठी त्या दोन गोष्टींवर हिंदू- मुस्लीम भेदाभेद निर्माण होणार असल्याच्या कपोलकल्पित कहाण्या रचल्या, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

भागवत म्हणाले, नागरिकत्व कायद्यामुळे कुठल्याही मुस्लिमांचा तोटा होणार नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते, ते आतापर्यंत पाळण्यात आले आहे. आम्हीही पाळत आहोत. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कुठल्याही मुस्लिमाचे काही नुकसान होणार नाही. ‘सिटिझनशिप डिबेट ओव्हर एनआरसी अँड सीएए – आसाम अँड पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.

नागरिकत्व कायदा अल्पसंख्याकांना फायद्याचा असल्याचे सांगून ते म्हणाले, की आम्ही बहुसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करीत आहोत. परदेशातील अल्पसंख्याक लोकांनाही जर तेथे काही त्रास व भीती असेल तर त्यांना परत बोलवत आहोत. एनआरसीबाबत त्यांनी सांगितले, की आपल्या देशाचे नागरिक कोण आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. हे प्रकरण राजकीय परिप्रेक्ष्यात खुले आहे. काही लोकांनी या सगळ्या प्रकाराचा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याभोवती जातीय गोष्टी जोडून कपोलकल्पित कहाण्या तयार केल्या.