देशभरात सीएए (सुधारित नागरिकत्व कायद्या)वरून वादंग सुरू असताना, आता एनपीआरमुळे (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) एनआरसीचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मुद्दा देखील चर्चेत आल्याचे दिसत आहे. काँग्रेसह विरोधी पक्षांकडून सुधारित नागरिकत्व कायद्याचा जोरदार विरोध केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत राजघाटावर काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांचा सहभाग होता. त्यानंतर आता मध्यप्रेदशची राजधानी भोपाळ येथे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वात या कायद्याविरोधात काँग्रेसकडून शांती मार्च काढण्यात आला आहे. या मोर्चानंतर माध्यमांशी संवाद साधून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत, हा आज प्रश्न नाही. ते वेगवेगळी विधानं करत आहेत. कायद्यात काय समाविष्ट आहे, याचा प्रश्न नाही, ज्याचा यात समावेश नाही त्याबद्दल प्रश्न आहे. तसेच, प्रश्न या कायद्याच्या उपयोगाचा नाहीतर दुरुपयोगाचा आहे, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल बोलताना म्हटले आहे.

तसेच, सीएए व एनआरसी मध्यप्रदेशमध्ये लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, आमचे राज्या सीसीए धुडकावून लावत आहे तर एनआरसी देखील या ठिकाणी लागू होणार नाही. हे घटनाविरोधी आहेत. आमची ओळख आमच्या राज्यघटनेमुळे आहे. देशाची संस्कृती ही जोडण्याची व नाती निर्माण करण्याची आहे व हीच काँग्रेसची देखील संस्कृती आहे.